दुष्काळ आलाच आहे म्हणून थोडे संगावसे वाटते
Posted By Vikram Dhembare On 10/5/2012 12:00:00 AM
दुष्काळ आलाच आहे म्हणून थोडे संगावसे वाटते आहे. तसे पाहायला गेले तर आपल्या भागात दुष्काळ पडला हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेकदा दुष्काळ पडला आहे परंतु त्यातून आपण नक्की काय शिकलो ? दुष्काळ पुन्हा पुन्हा पडतो हे आपणास ठाऊक असून सुद्धा आपण हातावर हात ठेऊन कोणीतरी येईल आणि आपल्याला यातून बाहेर काढेल याची वाट पाहत बसलो आहोत, परंतु यातून आपण काय मार्ग काढू शकतो याचा विचार कधीच केलेला दिसून येत नाही. मागे वळून पाहायला गेले तर लक्षात येते कि आज आलेल्या या परिस्थितीला कारणीभूत हे आपणच आहोत. . . ते कसे? थोडा विचार करा की निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा आपण निसर्गाला शिव्या शाप देण्यापलीकडे काहीच करीत नाही, परंतु आजवर आपण निसर्गाची केलेली हानी मात्र आपल्या लक्षात कधीच येत नाही. कधी एखादे झाड तोडताना विचार केला आहे का की हे जुने झाड तोडण्या आधी आपण किती नवीन झाडे लावली आणी जागवली ? आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेले वृक्ष आपण आज देखील पाहतो परंतु आपल्या पुढच्या पिढ्या नक्की काय पाहतील हा प्रश्न तुम्हाला पडतो का ? पाणी उपलब्ध असते तेव्हा त्याचा वापर कसा आणी किती प्रमाणात करावा हे कधी लक्षात घेतले आहे का ? पाणी मिळवण्यासाठी जमीनीच्या पोटात खोल खोल छिद्र पडताना तुम्ही किती पाणी अडवले आणी मुरवले याचा विचार केलात कधी ? एकूण काय ? आजच्या परिस्थितीत कोणालाच असे वाटत नाही की आपण या निसर्गाचे देणे लागतो. फक्त निसर्गाने आम्हाला देत जावे आणी आम्ही ते वाटेल तसे उधळीत जावे आणी संपले की निसर्गाला बोल लावावेत. सरकार हे करीत नाही, ते करीत नाही हे तर आता सर्वांकडून ऐकायला मिळते. . . अहो पण सरकार म्हणजे तरी कोण आहे ? आपलेच लोक आहेत ज्यांना आपले भागले की जनतेचे काही चिंताच नसते आणी या लोकांच्या भरवश्यावर आमची जनता मात्र प्रगतीची वाट बघत असते. आता जर का हे चित्र बदलले नाही तर पुढे मात्र खूप वाईट दिवस येणार यात काही शंकाच वाटत नाही. आपण सर्वांनी स्वतःशी निश्चय करून येणाऱ्या दिवसात जास्तीत जास्त झाडे लावावीत आणी जगवावीत तसेच उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल यावर विचार आणी कृती करावी.प्रेत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर बदल नक्कीच घडून येतील - विक्रम ढेंबरे
|