अंतर: दहिवडी पासून साधारणतः ५ किमी
कसे जाल: पुणे, दहिवडी, फलटण, अकलूज, विटा पासून बसेस उपलब्ध
गोंदवले विषयी माहिती
गोंदवले :
सातारा पंढरपूर मार्गावर दहीवडी पासून ५ कि.मी. अंतरावर वसलेले हे गाव श्रीरामभक्त श्री ब्रम्हचैतन्य महाराज यांचे जन्म स्थान आहे. या गावात श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची समाधी, निवासस्थान, तसेच महाराजांनी स्थापिलेली राम मंदिरे, दत्तमंदिर आणि शनी मंदिर आहे. गोंदवल्यात महाराष्ट्राच्या अनेक भागातून दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक भेट देतात.
श्री ब्रम्हचैतन्य महाराज:शके १७६६ माघ शुद्ध द्वादशी (दि.१९ फेब्रुवारी, १८४५) बुधवारी सकाळी गोंदवले बुद्रुक येथील एका विठ्ठलभक्त कुटुंबात महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या आईचे नाव गीतामाई आणि वडिलांचे नाव रावजी होते. महाराजांचे आजोबा लिंगोपंत हे विठ्ठलाचे भक्त असून हे कुटुंब नियमित पंढरीची वारी करीत असत. महाराजांचे लहानपणीचे नाव गणपती होते लाडाने गणोबा किवा गणू महणून ओळखले जायचे. कुटुंबात असलेल्या भक्तिमय वातावरणात गणोबांस रामभक्तीची गोडी लहानपणापासूनच लागली.
वयाच्या ९ व्या वर्षी ते घर सोडून गुरुशोधार्थ घर सोडून बाहेर पडले परंतु वडीलंनी त्यांना कोल्हापूर येथून पुन्हा घरी आणले. काही काळ लोटल्यानंतर महाराज पुन्हा घरत्याग करून गुरुच्या भटकू लागले. बऱ्याच साधू-संतांच्या भेट घेत घेत ते मराठवाड्यातील नांदेड जवळील येहेळगावी 'श्रीतुकामाई' यांचे शिष्य झाले. गुरूंच्या सानिध्यात भक्तीसाधना तसेच गुरुआज्ञेचे पालन करीत वयाच्या १४ वर्षी त्यांनी 'श्रीतुकामाई' कडून 'ब्रम्ह्चैतन्य' हे नाव प्राप्त केले आणि त्यांच्या आज्ञने प्रमाणे अनुग्रह देण्याचा अधिकार घेऊन तीर्थाटनास प्रारंभ केला.
राम नामाचा प्रसार करीत महाराज ९ वर्षानंतर गोंदवले येथे परतले आणि पुढील आयुष्य राम नामाचा प्रसार करीत आणि राम मंदिरांची स्थापना करण्यात व्यतीत केले. तीर्थयात्रा, गोरक्षा, गोदान आशय अनेक गोष्टी त्यांच्या चरित्राचे विविध अंग आहेत. प्रपंचा करीत परमेश्वर भक्ती करावी. कोणत्याही परिस्थितीत अखंड राम नाम जपावे हि त्यांची शिकवण आहे. सामान्य जनतेसते सोप्या भाषेत संवाद साधत त्यांना आयुष्य कसे जगावे याचे मार्गदर्शन करीत.
श्रीरामांवर महाराजांची असलेले भक्ती वेळो वेळी दिसून येत असे. आजच्या काळात नामस्मरणाचे महत्व ते विविध प्रकारे समजेल आशय शब्दात सांगत. ||श्री राम जय राम जय जय राम || हा नाम मंत्र त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन आणि चर्चा अश्या अनेक मार्गातून जनलोकांपर्यंत पोहचवला. अविरत रामनामाच्या जपाने समाधान आणि आनंदप्राप्तीचा प्रत्यय महाराजांचे साधक नेहमी अनुभवतात.
शके १८३५ मार्गशीर्ष वद्य दशमीला (दि. २२ डिसेंबर १९१३) सोमवारी पहाटे महाराजांनी आपला देह ठेवला परंतु त्यांच्या शिकवणी आजून लाखो भाविकांस भक्तिमार्ग दाखवते. गोंदवले येथे महाराजांनी स्थापन केलेल्या मंदिरांमध्ये मनोभावे पूजन केले जाते तसेच समाधी परिसरात आजही मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते.
गोंदवले येथे श्रीसमाधी मंदिरात पाहते भूपाळ्या, काकड आरती, त्रिकाळ पूजा, नामजप, विष्णू सहस्रनाम, पंचपदी भजन, शेजारती हा नित्योपासना केली जाते तसेच श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्ठमी आणि दासनवमी हे उत्सव साजरे केले जातात. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष महिन्यात वाद्य प्रतिपदेपासून दशमी पर्यंत केला जातो.
या मांगल्यपूर्ण आणि राम नामात न्हाऊन निघलेल्या पवित्र स्थानास नक्की भेट द्या.